नागपूर : भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाबद्दलची निष्ठा आणि गोरगरिबांसाठी कार्य करत असल्याची भावना माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. मंत्रीपदाच्या चर्चा होऊनही त्यांचे नाव मंत्रिमंडळात समाविष्ट न झाल्याने त्यांनी पक्षाबाबत सकारात्मक बाजू मांडली आहे. "मी व्यथित असण्याचे काहीही कारण नाही. पक्ष जी जबाबदारी देईन, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची तयारी आहे. मंत्रिमंडळात माझं नाव नव्हतं, याचा मला खेद नाही. पक्षासाठी मी नेहमीच कार्यरत राहणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
मुनगंटीवारांनी आपल्या विधानात गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त करत सांगितले की, "कॅबिनेटमध्ये विषय मांडायचे होते, आता विधानसभेत मांडेन." देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या कार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि "श्रद्धा आणि सबुरी" हेच पुढील कार्याचे सूत्र असल्याचे यावेळी म्हटले.
आपल्या जुन्या संसदीय पुस्तकांचा अभ्यास पुन्हा सुरू केल्याचे सांगत, "गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सर्व संसदीय आयुधांचा वापर करणार आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मंत्रीपदाच्या चर्चेविषयी विचारल्यावर काय म्हणाले, "पक्ष कधीही संकुचित दृष्टिकोन ठेवत नाही. माझी लढाई केवळ मंत्रीपदापुरती नाही, तर मतदारसंघातील जनतेसाठी आहे."
सुधीर मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्वावर आणि वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास असल्याचे दाखवत, "पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. मी नेहमी पक्षासाठी आणि जनतेसाठी समर्पित राहणार," असे नमूद केले.
गोरगरिबांचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडण्याचा संकल्प व्यक्त करताना मुनगंटीवार यांनी आपल्या राजकीय कार्याचा सकारात्मक दृष्टिकोन दाखवून दिला. त्यांच्या या विधानांनी पक्षावरील निष्ठा आणि जनतेसाठी काम करण्याचा त्यांचा दृढसंकल्प प्रसारमाध्यमांसमोर अधोरेखित झाला आहे.