इस्लामपूर: शहरातील उरुण परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. एका कुटुंबाच्या घराच्या दारात करणी-भानामतीचा प्रकार करण्यात आला असून, बोकडाचे मुंडके, सुया टोचलेल्या बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकवाचा वापर करत अघोरी पूजा करण्यात आल्याचे आढळून आले आहे. सकाळी घराचा दरवाजा उघडताच हे भीषण दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब हादरले.
घटनेचा तपशील
घराच्या प्रवेशद्वारावर बोकडाचे मुंडके आणि त्याचे पाय हळदी-कुंकू लावून लटकवले होते. याशिवाय तिथे सुया टोचलेल्या बाहुल्या, काळे नारळ, कापलेले लिंबू, मिरच्या आणि झाडांच्या फांद्या ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तूंवर हळद-कुंकू आणि गुलाल टाकण्यात आला होता. अघोरी पूजेच्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबाने तात्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत माहिती दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव संजय बनसोडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागरिकांचे प्रबोधन करत अशा घटनांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.