नवी दिल्ली: इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे 26 वर्षाची गर्भवती महिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा जीव धोक्यात आला आहे.
वृत्तानुसार, 26 वर्षांची गर्भवती महिला 34 आठवड्याची गर्भवती होती. यादरम्यान तिला असह्य वेदनांचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने थेट रुग्णालय गाठले. यावेळी तिची सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड) करण्यात आली. तेव्हा सोनोग्राफीमधील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.
महिलेच्या पोटात 35 सेंटिमीटरचा सिस्ट
उपचारावेळी महिलेच्या गर्भाशयात एक भली मोठी गाठ असल्याचे समोर आले. ही गाठ इतकी मोठी होती की तिने गर्भाशयाला उजव्या बाजूला ढकललेलं होतं. यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ लागला.
हेही वाचा: Afghanistan Earthquake Update: अफगाणिस्तानमधील भूकंपात 1400 हून अधिक जणांचा मृत्यू; 3000 पेक्षा जास्त जखमी
दरम्यान, सहा आठवड्यांआधी केलेल्या सोनोग्राफीत महिलेच्या अंडाशयात एक छोटा सिस्ट दिसला. कोणीही विचार केला नव्हता की हे सिस्ट वाढून 35 सेंटिमीटर होऊन 'मॉन्स्टर ट्युमर' होईल आणि आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण करेल. हे सिस्ट इतक्या वेगाने मोठे होईल असे डॉक्टरांना वाटले नव्हते. मात्र हेच सिस्ट गर्भाशयाला दाबायला लागले आणि संपूर्ण पोटाचा ताबा घेण्यास सुरुवात केली.
महिलेची परिस्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशनचा निर्णय घेतला. चार तासांच्या अवघड ऑपरेशनदरम्यान, डाव्या बाजूच्या अंडाशयातील 35 सेंटिमीटरचा सिस्ट (गाठ) बाहेर काढण्यात आला. तो सुमारे 11 लीटर द्रवाने भरलेला होता. विशेष म्हणजे पोटातून काढलेल्या गाठीमुळे कॅन्सरचा धोका नव्हता. यावेळी महिलेची प्रसुतीही झाली. बाळाचे वजन 2.2 किलो आहे. एवढ्या अवघड परिस्थितीत बाळ निरोगी आहे ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.
हेही वाचा: Quetta Rally Blast in Pakistan: पाकिस्तानातील क्वेटा हादरले! राजकीय रॅलीत भीषण स्फोट; 14 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी
आई आणि बाळ दोघेही सुखरुप
ऑपरेशनच्या काही दिवसांतच महिलेची प्रकृती झपाट्याने सुधारली आणि तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत. या घटनेला लोक वैद्यकीय चमत्कार म्हणत आहेत. कारण एवढा मोठा सिस्ट असूनही, आई आणि बाळाचे सुखरुप असणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.