Cyber Fraud: ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या आणखी एका धक्कादायक प्रकरणात, 76 वर्षीय महिलेला तब्बल 43 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. आरोपींनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिच्या नावावर अटक वॉरंट असल्याचे सांगितले आणि सुरक्षेच्या नावाखाली पैसे उकळले. पीडित महिला, सरला देवी या नोएडाच्या सेक्टर-41 मध्ये राहतात. त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की सरला देवी यांच्या तपशीलांचा वापर मुंबईत बँक खाती उघडण्यासाठी करण्यात आला आहे. त्या खात्यांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी निधी, हवाला व्यवहार आणि जुगारासाठी करण्यात आल्याचा खोटा दावा करण्यात आला. इतकेच नव्हे तर कॉलरने त्यांना धक्कादायक माहिती देत सांगितले की तिचा नंबर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वापरला गेला आहे, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
कॉलरने महिलेला घाबरवून सांगितले की तिच्या नावावर अटक वॉरंट निघाले आहे आणि तुरुंगवास टाळण्यासाठी तिला तातडीने सुरक्षा म्हणून मोठी रक्कम भरावी लागेल. चौकशीत तिची निरपराधी सिद्धता झाल्यानंतर ती रक्कम परत दिली जाईल, असेही पीडितेला सांगण्यात आले. 20 जुलै ते 13 ऑगस्ट या काळात वृद्ध महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये QR कोडद्वारे रक्कम भरण्यास भाग पाडले गेले. या दरम्यान तिने आठ हप्त्यांमध्ये एकूण 43.70 लाख रुपये भरले. पहिला व्यवहार 70 हजार रुपयांचा होता, तर सर्वात मोठा व्यवहार तब्बल 11 लाख रुपयांचा होता.
हेही वाचा - Arun Gawli : शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीला दिलासा; तब्बल 18 वर्षांनंतर जामीन मंजूर
तपासात उघड झाले की, या व्यवहारातील पैसे वरिंदर पाल सिंग, मदन कुमार, मंजू जनरल स्टोअर आणि आशापुरा टी स्टॉल या नावांवर असलेल्या खात्यांमध्ये जमा झाले. एका टप्प्यावर तिला 15 लाख रुपये भरायला भाग पाडले गेले, अन्यथा तिला अटक होईल, अशी धमकी देण्यात आली. शेवटी संशय आल्याने महिलेने वकिलाचा सल्ला घेतला आणि ती सायबर फसवणुकीची बळी ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिने लगेचच पेमेंट थांबवले आणि सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.
हेही वाचा - Chhatisgarh Crime News : छत्तीसगड हादरलं! बदला घेण्यासाठी शिक्षकाने मिसळलं 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल
फसवणुकीमुळे मानसिकदृष्ट्या व्यथित झालेल्या महिलेने पोलिसांना विनंती केली आहे की तिचे पैसे परत मिळावेत आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या डिजिटल फसवणुकीत वृद्ध नागरिक हे प्रमुख लक्ष्य असतात. तंत्रज्ञानाविषयी कमी माहिती आणि भीतीचा फायदा घेत आरोपी त्यांची आजीवन कमाई लुटतात.