Anant Chaturdashi 2025 : अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. तसेच, हा दिवस गणपती विसर्जनाचाही दिवस असतो. त्यामुळे या दिवशी गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देतात.
यंदाची अनंत चतुर्दशी शनिवारी (6 सप्टेंबर) आहे. त्यामुळे या दिवसाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी भगवान श्रीविष्णू आणि माता श्रीलक्ष्मी यांच्यासह हनुमान आणि शनिदेव यांचेही पूजन करणे अत्यंत शुभ ठरेल.
हेही वाचा - Ganeshotsav 2025: गणपती विसर्जनाआधी उंदीर दिसला, हा आहे मोठा संकेत, जाणून घ्या...
अनंत चतुर्दशीची पूजा कशी करावी?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच, या दिवशी दान करण्याचेही महत्त्व सांगितले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाला अनंत पटीने पुण्य मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे. यामागे अनेक पौराणिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
पूजा करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे:
1. तयारी कशी करावी?
- सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा.
- पूजेच्या ठिकाणी चौरंग किंवा लाकडी पाटावर लाल रंगाचे कापड अंथरा.
- त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
- अनंत सूत्र (अनंत धागा) तयार करा. यासाठी 14 गाठी असलेला रेशीम किंवा सुती धागा वापरा.
2. पूजा विधी:
पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेने करा. नंतर भगवान विष्णूचे ध्यान करून त्यांना आवाहन करा. मूर्तीला किंवा प्रतिमेला हळद, कुंकू, चंदन आणि अक्षता अर्पण करा. त्यांना फुले, तुळशीची पाने आणि नैवेद्य (गोड पदार्थ, जसे की खीर किंवा लाडू) अर्पण करा. अनंत सूत्र भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवा आणि त्याची पूजा करा. "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप करा. पूजेनंतर अनंत सूत्र पुरुषांनी उजव्या हाताच्या दंडावर आणि महिलांनी डाव्या हाताच्या दंडावर बांधावे.
3. कथा आणि आरती:
पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीची कथा वाचा किंवा ऐका. यामुळे पूजेचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. त्यानंतर भगवान विष्णूची आरती करून पूजा समाप्त करा.
अनंत चतुर्दशीला दान करण्याचे महत्त्व
पुण्यप्राप्ती: अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी केलेले दान अनंत पुण्य देते, असे मानले जाते. 'अनंत' या नावाप्रमाणेच या दानाचे फळ अमर्याद असते.
पापांचे क्षालन: दान केल्याने कळत-नकळत झालेल्या पापांचे क्षालन होते.
समृद्धी: या दिवशी केलेल्या दानाने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते, असे मानले जाते.
हेही वाचा - Ganeshotsav 2025 : 'या' देशात आहे जगातील सर्वात उंच गणपतीची मूर्ती; जाणून घ्या
अनंत चतुर्दशीला कोणत्या वस्तूंचे दान करावे?
या दिवशी दान करण्यासाठी काही विशिष्ट वस्तू सांगितल्या आहेत. या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. या शनिवार असल्याने शनिदोष निवारण करण्यासाठी काळे तीळ, मोहरीचे तेल, निळी फुले, काळे वस्त्र शनिदेवाला अर्पण करावे किंवा यातील ज्या वस्तू दान करणे शक्य असेल, त्या दान कराव्यात.
अन्नदान: गरजू लोकांना अन्नदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
वस्त्रदान: गरिबांना आणि गरजूंना नवीन कपड्यांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. तसेच, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू, चादर, शाल यांचेही दान करू शकता.
गूळ आणि गहू: गूळ आणि गहू यांचे दान करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
फळे आणि नारळ: फळे आणि नारळ यांचे दान केल्याने घरात धनधान्य वाढते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
दक्षिणा: दान करताना यथाशक्ती दक्षिणा देणे देखील शुभ मानले जाते.
या दिवशी केलेल्या दानाने तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी नक्कीच येईल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)