Sunday, August 31, 2025 06:31:51 AM

Ganesh Visarjan 2025: मुंबईत गणेश विसर्जनावेळी जेलीफिश-स्टिंग रेचा धोका; स्वतःचे रक्षण कसे कराल? जाणून घ्या

यावर्षी समुद्रात ब्लू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे या जलचरांच्या उपस्थितीमुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

ganesh visarjan 2025 मुंबईत गणेश विसर्जनावेळी जेलीफिश-स्टिंग रेचा धोका स्वतःचे रक्षण कसे कराल जाणून घ्या

मुंबई: गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक समुद्रकिनाऱ्यांवर मूर्ती विसर्जनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी समुद्रात ब्लू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे या जलचरांच्या उपस्थितीमुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. पावसाळ्याच्या मोसमात म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात हे समुद्री जीव किनाऱ्याच्या उथळ पाण्यात येतात. अशावेळी विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना दंश होण्याचा धोका निर्माण होतो.

महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित विभागांना समन्वयात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागानेही दिलेल्या अहवालात जेलीफिश व स्टिंग रे प्रजातींचा वावर या कालावधीत अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. किनाऱ्यावरील शांत पाण्यामुळे आणि मुबलक खाद्य उपलब्ध असल्याने हे जलचर येथे सहज वाढतात.

हेही वाचा: Lalbaughcha Raja 2025 : लालबागचा राजा मंडळाला बीएमसीची नोटीस ; 24 तासांचा अवधी अन्यथा...

पालिकेकडून नागरिकांसाठी सूचना

विसर्जनावेळी सुरक्षिततेसाठी पालिकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

-विसर्जनासाठी पालिकेच्या देखरेखीखालील जीवरक्षक आणि यंत्रणेचा उपयोग करावा.

-समुद्रात उघड्या अंगाने किंवा खूप खोलवर जाऊ नये.

-चौपाट्यांवर उभारलेल्या नागरी गणेशोत्सव प्रणालीचा वापर करावा.

-वैद्यकीय कक्षात औषधांचा साठा ठेवण्यात आला असून 108 रुग्णवाहिकाही तैनात आहेत.

-पालिकेच्या सूचना फलक व उद्घोषणांवरून देण्यात येणाऱ्या संदेशांचे पालन करावे.

-लहान मुलांना पाण्यात जाऊ देताना विशेष दक्षता घ्यावी.

हेही वाचा: Lalbaughcha Raja 2025 : Vasai Virar Building Collapse : वसई-विरारमध्ये इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

मत्स्यदंश झाल्यास काय करावे?

-ब्लू बटन जेलीफिशचा दंश झाल्यास तीव्र खाज सुटू शकते, तर स्टिंग रे माशाचा दंश जळजळ व चटका जाणवतो. अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.

-जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.

-जखम चोळू नये.

-शक्य असल्यास जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

-जेलीफिशच्या स्पर्शकांना काळजीपूर्वक काढून टाकावे.

सावधगिरीतच खरी सुरक्षितता

गणेश विसर्जनाचा आनंद घेताना सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची आहे. भाविकांनी पालिकेने जारी केलेल्या नियमांचे पालन केले तर कोणताही अपघात किंवा जीवघेणा प्रसंग टाळता येऊ शकतो. जेलीफिश व स्टिंग रे हे समुद्रातील नैसर्गिक जीव आहेत, मात्र त्यांच्या संपर्कात आल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे विसर्जनावेळी जबाबदारीने व सुरक्षिततेने सण साजरा करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री