Thursday, September 18, 2025 05:30:52 PM

PM Modi Talk Sushila Karki: पंतप्रधान मोदींची सुशीला कार्की यांच्याशी चर्चा; भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरता आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.

pm modi talk sushila karki पंतप्रधान मोदींची सुशीला कार्की यांच्याशी चर्चा भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

PM Modi Talk Sushila Karki: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी गुरुवारी फोनवरून संवाद साधत शेजारी देशाला भारताचा पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरता आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. नेपाळमध्ये अलीकडेच सोशल मीडिया बंदी घालण्यात आली होती. या निर्णयामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निदर्शने सुरू केली. भ्रष्टाचाराविरोधातील असंतोषामुळे ही आंदोलनं वेगाने हिंसक झाली. राजधानी काठमांडूसह देशाच्या विविध भागांत झालेल्या संघर्षांमध्ये किमान 74 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या दबावामुळे तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी 9 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला. त्यानंतर, नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज सुशीला कार्की यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर दिली आहे. मोदींनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. अलीकडील हिंसाचारात झालेल्या दुःखद जीवितहानीबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त केल्या. शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताचा ठाम पाठिंबा असल्याचे अधोरेखित केले. तसेच उद्याच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मी त्यांना आणि नेपाळच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.' 

हेही वाचा - 20 Years Old Vehicles Rule : जुन्या गाड्यांचे टेन्शन आता संपले! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पण.

दरम्यान, मणिपूरमध्ये झालेल्या एका सभेत मोदींनी कार्की यांच्या नियुक्तीचे वर्णन 'महिला सक्षमीकरणाचे उज्ज्वल उदाहरण' असे केले. त्यांनी भारत-नेपाळ संबंधांची ऐतिहासिक व सांस्कृतिक बांधिलकी अधोरेखित करत सांगितले की, 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने मी कार्की यांचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की त्या नेपाळमध्ये स्थैर्य व समृद्धीचा नवा मार्ग दाखवतील. 

हेही वाचा - EC Dismisses Rahul Gandhi's Allegations: 'सर्व आरोप चुकीचे आणि निराधार...'; राहुल गांधींनी लावलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

कार्की यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमुळे नेपाळमधील अनेक दिवस चालू असलेली राजकीय अनिश्चितता आणि आंदोलनांचा ताण काही प्रमाणात शमण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि तरुण निदर्शक यांच्यातील बैठकीनंतर कार्की यांची हंगामी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.
 


सम्बन्धित सामग्री