Putrada Ekadashi Vrat 2025 : श्रावणातील पहिली एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. ही शुक्ल पक्षातील एकादशी असते. उद्या 5 ऑगस्ट 2025 (मंगळवारी) पुत्रदा एकादशी आहे. हिला पवित्रा एकादशी असेही म्हणतात. पुत्रदा एकादशीचे व्रत खास करून पुत्रप्राप्तीसाठी केले जाते. ज्या जोडप्यांना मूल हवे आहे किंवा संतती मध्ये अडचणी येतात ते लोक हे व्रत करतात. चला तर मग पुत्रदा एकादशी कधी आहे आणि तिचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया.
या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ही एकादशी साजरी होणार आहे. ज्या लोकांना मूल होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात. एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. एकादशीनिमित्त उपवास केला जातो.
पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11.42 वाजता सुरू होत आहे. ही तिथी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1.13 वाजेपर्यंत असणार आहे. सूर्योदयाच्या वेळेनुसार एकादशी 5 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे याच दिवशी व्रत केले जाईल. या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रासोबत रवि योग पण आहे. तसेच पहाटे 4.20 ते 5.02 पर्यंत ब्रह्म मुहूर्त आणि दुपारी 12 ते 12.54 पर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. हे मुहूर्त खूप चांगले मानले जातात. हे मुहूर्त शुभ कार्य आणि पूजा-पाठ करण्यासाठी उत्तम आहेत.
हेही वाचा - Shravan Somvar 2025: सोमवारसह आठवड्याभरात तयार होतायत हे दुर्मीळ योग! या राशींची होणार मोठी भरभराट..
एकादशीचे व्रत आणि उपवास कसा करावा?
दशमीच्या रात्री सात्विक भोजन करून ब्रह्मचर्य पालन करावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून हातात पाणी, फूल आणि अक्षता घेऊन 'मी आज पुत्रदा एकादशीचे व्रत करत आहे, तरी माझे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होवो आणि मला संतती सुख प्राप्त होवो' असा संकल्प करावा.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती-पत्नींनी हे व्रत करावे. तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी. त्यामुळे संतान प्राप्तीची शक्यता वाढते. यासोबतच भगवान विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा समस्या, त्रास दूर होतात अशी मान्यता आहे.
अशी पूजा करावी
एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. श्रीहरी विष्णूला जल, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), चंदन, तुळशीची पाने, पिवळी फुले आणि पिवळी वस्त्रे अर्पण करावीत. तुळशीचे पान हे विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे ते अवश्य अर्पण करावी. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.
पूजा झाल्यावर पुत्रदा एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी. असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते. विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू स्तोत्राचे पठण करावे. श्री हरी विष्णूंना सात्विक नैवेद्य अर्पण करावा. यामध्ये दूध, खीर, फळे किंवा मिठाईचा समावेश असावा. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाणे वर्ज्य मानले जाते.
संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे विशेष उपाय -
संतती प्राप्तीसाठी काही विशेष उपाय केले जातात, पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करणे खूप शुभ मानले जाते. गायीला हिरवा चारा किंवा गूळ-पोळी खाऊ घालणे लाभदायक मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्याची पूजा केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात. संध्याकाळी तुळशीच्या रोपाला दिवा लावून त्याची पूजा केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. या विधी आणि उपायांनी पुत्रदा एकादशीचे व्रत पूर्ण केल्यास भगवान विष्णूंच्या कृपेने संततीची इच्छा पूर्ण होते, कुटुंबात सुख-शांती येते आणि सर्व कष्ट दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हेही वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी अशी चूक करू नका; नाहीतर, बहीण-भावाच्या नात्यात पडू शकते दरी
पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते. पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात येते. श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यातच आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करतात. त्यामुळे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला भगवान शंकर आणि विष्णू दोघांचीही कृपा मिळवण्याची संधी आहे. या दिवशी तुमची संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. हे पुत्रदा एकादशीचे महत्त्व आहे.
(Disclaimer : वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)