Panvel: शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील डान्स बार संस्कृतीवर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम तात्काळ दिसून आला. पनवेलमधील कोन गावातील 'नाईट रायडर्स' या डान्स बारवर शनिवारी सायंकाळी मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत तोडफोड केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात रायगडमधील वाढत्या परप्रांतीय लोकसंख्येवर आणि डान्स बार संस्कृतीवर टीका करत, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र रायगड जिल्ह्याची ओळख आता डान्सबारमुळे खराब होऊ लागली आहे. डान्सबार ही संस्कृती छत्रपतींच्या महाराष्ट्रात मान्य नाही,' असं ठणकावून सांगितलं.
त्याच रात्री मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. योगेश चिले यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'महाराजांच्या पावन भूमीत बाया नाचवणारे डान्स बार आम्ही चालू देणार नाही.' त्यांनी आरोप केला की, 'डान्सबार तर बंद झाले होते, मग आता हे कुठून आले?' या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.