बडनेरा : बडनेरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे रवी राणा विजयी झाले. त्यांनी एक लाख 27 हजार 800 मते मिळवत अपक्ष उमेदवार प्रिती बंड यांचा पराभव केला. रवी राणा यांनी अपक्ष उमेदवाराचा 66 हजार 974 मतांनी पराभव करत बडनेराची जागा राखली. याआधी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही रवी राणा यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. रवी राणांच्या उमेदवारीला भाजपाने जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे रवी राणा हे तांत्रिकदृष्ट्या महायुतीचेच नेते आहेत. रवी राणांच्या विजयानंतर त्यांच्या पत्नी आणि माजी खासदार नवनीत राणा तसेच रवी राणा यांचे समर्थक यांनी विजयाचा गुलाल उधळला आणि ढोलताशांच्या गजरात नृत्य करत जल्लोष केला.