मुंबई: भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शोपैकी एक असलेला 'बिग बॉस' पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सलमान खानच्या होस्टिंगमुळे शोने खास ओळख निर्माण केली आहे. पण अलीकडील मीडिया रिपोर्ट्समधून असे संकेत मिळत आहेत की, 'बिग बॉस 19' हा आगामी सीझन कदाचित प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. ही बातमी शोच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोची निर्मिती करणारी कंपनी एंडेमोल शाईन इंडिया यंदाच्या नव्या सीझनपासून माघार घेत आहे. तथापि, जय महाराष्ट्र या बातम्यांना दुजोरा देत नाही. मागील काही सीझनमध्ये टीआरपी घसरल्यामुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे कंपनीने कलर्स चॅनेलसोबतचा करारही थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चे भवितव्य सध्या अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे.
याचं एक कारण म्हणजे मागच्या वेळी स्पर्धकांवर पक्षपाती वागणूक झाल्याचा आरोप सांगण्यात येतोय. काही प्रेक्षक वर्गांनी याला विरोध केला होता, ज्याचा परिणाम शोच्या लोकप्रियतेवर आणि ब्रँड इमेजवर झाला. यामुळेच एंडेमोल शाईन इंडिया शोपासून दूर होण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले जात आहे. काही अहवालांनुसार, या निर्णयामुळे टीममधील अनेक कर्मचाऱ्यांची नोकरीही धोक्यात आली आहे.
तथापि, या चर्चांवर अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही. काही माध्यमांनी असेही म्हटले आहे की, शोचे प्रसारण हक्क दुसऱ्या चॅनेलला दिले जाऊ शकतात. सोनी टीव्हीसोबत करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक चाहत पांडे हिने देखील या चर्चांवर प्रतिक्रिया दिली असून, तिला या घडामोडीबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. आता प्रेक्षकांना फक्त अधिकृत घोषणा कधी येते याची प्रतीक्षा आहे.