मुंबई : उद्धव ठाकरेंना राऊतांनी भडकवलं. यामुळे उद्धव यांनी टोकाचा निर्णय घेतला. भाजपाची साथ सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला; असा गौप्यस्फोट रिपाईंच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले यांनी हा गौप्यस्फोट केला.
युतीची सत्ता आल्यास अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावे ही उद्धव यांची इच्छा होती. पण भाजपा आणि त्यांच्यात काही मुद्यांवर मतभेद झाले. नंतर संजय राऊत यांनी भडकवले आणि उद्धव यांनी भाजपाची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले. पण उद्धव यांच्या सहकाऱ्यांना आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांना हा निर्णय पटला नाही. त्यांनी वारंवार उद्धव यांना भाजपासोबत युतीत राहण्याचा सल्ला दिला. पण उद्धव ऐकत नव्हते. यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला आणि राज्यात महायुतीचे सरकार आले; असे रामदास आठवले म्हणाले.
ताकदीचं भान ठेवून किती जागा लढवायच्या यावर चर्चा केली जाते. याला जागा मागणे म्हणत नाही. महायुतीत रिपाईं - आठवले गटाचा क्रमांक प्रमुख पक्षांनंतर लागतो. रिपाईं - आठवले गट हा पक्ष छोटा असला तरी ताकद मोठी आहे. दलितांची मतं ही संपूर्ण राज्यात पसरली आहे. पण ती रिपाईं - आठवले गटामुळे महायुतीच्या उमेदवारांना हमखास मिळतात; असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरेंमुळे रिपाईं - आठवले गट आणि शिवसेना एकत्र आले. शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र यावी ही बाळासाहेबांची इच्छा होती. भाजपा बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या शिवसेनेसोबत होती. यामुळे शिवसेना, भाजपा आणि रिपाईं - आठवले गट अशी युती झाली. पुढे या युतीची महायुती झाली; असे रामदास आठवलेंनी सांगितले.