मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी भविष्यवाणी केली आहे. महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी कोणत्या दिवशी होणार, याबाबत अंधारेंनी भविष्यवाणी केली आहे. आता अमावस्या येत आहे. ही अमावस्या संपल्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी होईल, अशी भविष्यवाणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून भाजपाच्या दबावापोटीच एकनाथ शिंदेंनी माघार घेतली, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदेंनी भाजपाच्या खेळीत सहभागी होऊन उद्धव ठाकरेंचे सरकार पाडल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली; असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
याआधी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकार स्थापन करताना माझी अडचण होणार नाही. या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आहे. आता पंतप्रधान जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिंदेंनी केलेल्या घोषणेनंतर महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंचे जाहीर आभार मानले.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
- एकूण 288 जागा
- महायुती 230 जागांवर विजय
- भाजपा 132 जागांवर विजय
- शिवसेना 57 जागांवर विजय
- राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
- महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
- उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- शरद पवार गट 10 जागांवर विजय
- इतर 12 जागांवर विजय
जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे.