जळगाव : स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणीसाठी पहाटे शेगावकडे निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू केली. धारधार शस्त्रांनी डिक्कर यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून याचवेळी प्रशांत डिक्कर यांना हृदविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती हालाखीची असून पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एक विस्थापित भूमिहीन शेतमजुराचा मुलगा, शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्ता प्रथापितांसमोर मोठे आव्हान उभे करतो आणि विजयाची वाट धरतो. हे माजलेल्या प्रस्थापित आमदाराला पाहावले नाही. लोकशाही पद्धतीने आपला पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक आमदाराने हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे. हा माज आम्ही उतरवू असे स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.