मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर होताच प्रत्येक पक्ष विविध समाज आणि जनतेला खूश करण्यासाठी प्रयत्न करू लागला आहे. प्रत्येक समाज त्यांच्या अपूर्ण असलेल्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. यामुळे नाराज असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाने राजकीय पक्षांना इशारा दिला आहे. वीरशैव लिंगायत समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही आणि बांधता येणार नाही; असा इशारा अखिल वीरशैव लिंगायत महासंघाने राज्यातील सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. जे मागण्या मान्य करतील त्यांनाच पाठिंबा देण्याचा विचार करू असेही अखिल वीरशैव महासंघाने जाहीर केले.
वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्या
- वीरशैव लिंगायत हे केवळ हिंदूच आहेत, त्यांना स्वतंत्र धर्म मान्यता देणार नाही ही ठाम भूमिका
- वीरशैव लिंगायत समाजातील सर्वच जाती / पोटजातीतील OBC आरक्षणाचा मुद्दा तातडीने निकाली काढावा
- वीरशैव लिंगायत समाजातील इतर मागास वर्गीय व SC/ST याबाबत संभ्रम असून शासनाने सुधारीत पत्रक काढून ज्या समाजबांधवांकडे जे जातप्रमाणपत्र उपलब्ध आहे ते कायम करुन द्यावे
- महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा व भरीव निधी द्यावा
- केंद्र सरकारकडून वीरशैव लिंगायत समाजासाठी विशेष निधीसाठी मागणी
- मुंबई येथे आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य, महात्मा बसवेश्वर, संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज, अक्का महादेवी, राणी चेन्नम्मा, संत लक्ष्मण महाराज आदी महापुरुषांचे भव्य संयुक्त स्मारक या मागण्या जाहीरनाम्यात नमूद कराव्या