मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांवरून निर्माण झालेल्या वादावर मोठे वक्तव्य केले आहे. धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून, दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पारंपरिक धार्मिक श्रद्धा कायम ठेवतानाच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा तोडगा शोधला जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
कबुतरखाना बंदीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'असे वाटते की तिकडे आस्था आहे, लोकभावना आहे. परंतु, दुसरीकडे लोकआरोग्य देखील आहे. दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल.' म्हणजेच, केवळ आरोग्याच्या दृष्टीकोनातून कबुतरखान्यांना बंद करण्याचा मार्ग न घेता, तटस्थ आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून उपाययोजना केली जाईल.
हेही वाचा - मीरा रोडमध्ये कबुतरांना खायला देण्यास आक्षेप घेतल्याने वडील-मुलाला मारहाण; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं आहे की, धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. यावरून स्पष्ट होते की, सरकार हा विषय केवळ धार्मिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहत आहे.
हेही वाचा - न्यायालयाच्या आदेशानंतर BMC कडून कबूतरांना खायला देणाऱ्या 100 हून अधिक जणांना दंड
तथापी, काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहेत. ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षांची परंपरा खंडित होणार नाही आणि आरोग्याचेही प्रश्न निर्माण होणार नाहीत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुंबईत आणि इतर काही शहरांमध्ये कबुतरखान्यांमुळे परिसरात घाण, दुर्गंधी आणि श्वसनविकारासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. यामुळे कबुतरखाना राखण्याविरोधात काही संस्थांनी याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी अनेक वर्षांची श्रद्धा व परंपरा असल्यामुळे त्याबाबत निर्णय घेणे हे सरकारसमोरील एक संवेदनशील आव्हान ठरले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वक्तव्य संतुलन साधण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.