Cardamom Plant At Home: भारतीय स्वयंपाकात सुगंध आणि चव वाढवण्यासाठी इलायचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. चहा, गोडधोड पदार्थ, मिठाई किंवा औषधी उपयोगासाठी इलायची नेहमीच महत्त्वाची मानली जाते. परंतु बाजारात मिळणारी इलायची महाग असते. म्हणूनच अनेकांना प्रश्न पडतो की, इलायचीचे रोप घरच्या घरी लावता येईल का? तर उत्तर होय आहे. थोडी काळजी घेतली, तर आपण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा टेरेसवरही इलायचीची लागवड करू शकतो.
बिया कशा निवडाव्यात?
इलायचीच्या लागवडीसाठी चांगल्या गुणवत्तेच्या बियांची गरज असते. बाजारातून आणलेल्या ताज्या शेंगांमधून काळसर तपकिरी रंगाच्या बिया निवडाव्यात. या बियांची उगवण चांगली होते. लागवडीपूर्वी बिया रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवाव्यात. यामुळे कवच मऊ होते आणि उगवण पटकन होते.
माती व कुंडीची तयारी
इलायचीला दमट वातावरण आणि पाणी न साचणारी माती आवडते. कुंडीमध्ये 50% बागेची माती, 25% वाळू आणि 25% शेणखत मिसळून भरणे उत्तम. यामुळे माती सुपीक राहते आणि निथळण व्यवस्थित होते. कुंडी शक्यतो मोठी असावी, कारण इलायचीचे रोप हळूहळू पण दाट वाढते.
हेही वाचा: Sugar Side Effects: साखर खाल्ल्याने चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हं?, जाणून घ्या धक्कादायक परिणाम
लागवड कशी करावी?
भिजवलेल्या बिया मातीमध्ये साधारण 1-2 सें.मी. खोलीवर टाकाव्यात. त्यावर हलकी माती घालून कुंडी अर्धवट सावलीत ठेवावी. इलायचीचे रोप थेट उन्हात ठेऊ नये, कारण त्याला दमट आणि ओलसर वातावरणाची गरज असते.
पाणी व काळजी
इलायचीच्या रोपाला नियमित पाणी द्यावे, पण पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. जास्त पाणी दिल्यास मुळं कुजू शकतात. आठवड्यातून 2-3 वेळा हलक्या फवारणीने पाणी शिंपडल्यास रोपाला दमटपणा टिकून राहतो. रोपाभोवतीची माती सुकू देऊ नये.
वाढ व उत्पादन
इलायचीचे रोप हळूहळू वाढते. पहिल्या दोन ते तीन महिन्यांत छोटी पालवी दिसते. रोपाला पूर्ण झाड व्हायला साधारण 2-3 वर्षे लागतात. त्यानंतर फुलोरे येतात आणि सुगंधी शेंगा लागतात. घरच्या घरी लावलेले रोप जास्त उत्पादन देत नाही, परंतु घरगुती वापरासाठी पुरेसे असते.
हेही वाचा: Health Tips: 'या' सात सवयी किडनीला हानी पोहोचवू शकतात, जाणून घ्या...
उपयोग
इलायचीचा वापर केवळ पदार्थात चव आणण्यासाठीच नाही तर औषधी गुणधर्मांसाठीही केला जातो. अपचन, खोकला, तोंडाला दुर्गंधी अशा समस्यांवर ती उपयुक्त आहे. घरच्या घरी लावलेली इलायची रसायनमुक्त असल्यामुळे ती अधिक आरोग्यदायी ठरते.
थोडा संयम आणि योग्य काळजी घेतल्यास इलायचीचे रोप घरच्या घरी सहज लावता येते. आपल्या चहाला घरगुती इलायचीचा सुगंध मिळाला, तर त्याची चव आणखी खुलून येते.