Papaya Side Effects: पपईला (Papaya) आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन A, C, E भरपूर प्रमाणात असतात. शिवाय ‘पपेन’ नावाचा खास एन्झाईम असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण हे फळ नियमितपणे आहारात घेतात. पोट साफ ठेवणे, त्वचेला पोषण देणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अशा अनेक फायद्यांमुळे पपईला ‘सुपरफ्रूट’ म्हटले जाते.
मात्र आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पपई सर्वांसाठी सुरक्षित नाही. काही गटातील लोकांसाठी हे फळ हानिकारक ठरू शकते. योग्य माहिती नसल्याने अनेकदा लोक पपई खाऊन तब्येतीची बिघाड होण्याचा धोका पत्करतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपईपासून दूर राहावे.
हेही वाचा :Menstruation Delaying Pills : मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेतल्यानं युवतीचा मृत्यू; वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधं घेणं ठरू शकतं धोकादायक, तज्ज्ञ सांगतात..
1. गर्भवती महिला
गर्भारपणात अपक्व किंवा अर्धवट पिकलेली पपई खाणे धोकादायक असते. यामध्ये ‘लेटेक्स’ आणि ‘पपेन’ मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक गर्भाशय आकुंचन पावण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे अकाली प्रसूती, गर्भपात किंवा इतर गुंतागुंत होऊ शकते. म्हणूनच डॉक्टर गर्भवती महिलांना पपईपासून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्ला देतात.
2. हृदयरुग्ण
पपईमध्ये काही नैसर्गिक संयुगे असतात जी शरीरात गेल्यावर हायड्रोजन सायनाइड तयार करतात. निरोगी लोकांसाठी त्याचा परिणाम होत नाही, पण हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकते. पपईचे अतिसेवन केल्यास हृदयाची गती (Heart Rhythm) बिघडण्याचा धोका वाढतो.
3. लेटेक्सला अॅलर्जी असलेले लोक
अनेकांना लेटेक्सपासून अॅलर्जी असते. पपईतील काही प्रोटीन लेटेक्समध्ये असलेल्या प्रोटीनसारखेच असल्याने शरीरात क्रॉस-रिअॅक्शन होऊ शकते. अशावेळी पपई खाल्ल्यावर त्वचेवर खाज सुटणे, श्वास घेण्यात अडचण, शिंका किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसतात.
हेही वाचा :Yellow Nails Vitamin Deficiency: नखे पिवळी झाली आहेत?; 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण, जाणून घ्या उपाय
4. थायरॉईडचे रुग्ण
थायरॉईडची समस्या असलेल्या व्यक्तींनी पपई टाळणे गरजेचे आहे. पपईतील काही नैसर्गिक घटक थायरॉईड हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा आणतात. यामुळे थकवा, वजन वाढणे, थंडी असह्य होणे अशी लक्षणे आणखी तीव्र होतात. त्यामुळे थायरॉईड रुग्णांनी पपई खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
5. किडनी स्टोन असलेले रुग्ण
पपईमध्ये व्हिटॅमिन C प्रचंड प्रमाणात असते. सामान्य लोकांसाठी हे चांगले असले तरी ज्यांना आधीच मूत्रपिंडात खडे (Kidney Stone) आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरते. कारण जास्त व्हिटॅमिन C शरीरात ऑक्सालेट बनवते, जे कॅल्शियमशी मिळून स्टोन वाढवू शकते.
पपई हे निसर्गाचं एक वरदान आहे, पण ते अंधाधुंद खाल्ल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जर आपण वर सांगितलेल्या गटात येत असाल तर पपईपासून सावध रहा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करा.
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)