मालेगाव: ईदच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी झाली, पण काही चाहत्यांच्या वागण्यामुळे तिथे गोंधळ उडाल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे. मालेगावच्या एका थिएटरमध्ये चाहत्यांनी चित्रपट पाहताना अचानक फटाके फोडले, ज्यामुळे प्रेक्षकांना जीव मुठीत धरून बाहेर पळावे लागले.
थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘ए मेरी जोहरा जबीं’ या गाण्यादरम्यान काही उत्साही चाहत्यांनी आनंदाच्या भरात फटाके फोडण्यास सुरुवात केली. यामुळे थिएटरमध्ये धूर पसरला आणि प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली. अचानक उडालेल्या गोंधळामुळे अनेक प्रेक्षकांनी बाहेर पळ काढला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा: Sikandar Day 4 Box Office collection : सिकंदरने चौथ्या दिवशी 'दम' तोडला?, १०० कोटीचा आकडा गाठताना दमछाक
या घटनेवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी अशा प्रकारच्या वागणुकीवर संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. थिएटर व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनानेही याप्रकरणी दखल घेतली असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.