मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईत सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अवैध संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईत 23.92 किलोग्रॅम परदेशी चिन्हांकित सोने, 37 किलोग्रॅम चांदी आणि 5.40 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे 19.6 कोटी रुपये आहे.
डीआरआयला मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणी तस्करीच्या माध्यमातून आलेले सोने वितळवून ते शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी तयार करण्यात येत असल्याचे उघड झाले. या छाप्यात तस्करीमध्ये सहभागी असलेल्या काही कामगारांचे जबाब नोंदवण्यात आले आणि बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सामील असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला जप्त केलेल्या सोन्याच्या स्त्रोताबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच, कोणताही कायदेशीर कागदोपत्री पुरावा सादर करण्यात अपयश आल्यामुळे हा माल संघटित तस्करी गटाचा भाग असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
सध्याच्या परिस्थितीत मौल्यवान धातूंच्या तस्करीस आळा घालणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे. डीआरआयने केलेल्या या कारवाईने सोन्याच्या तस्करीविरोधातील लढाईत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.