पुणे: दौंड तालुक्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेनंतर, परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान, एका गटाने चक्क रस्त्यावरील दुचाकी गाड्या पेटवल्या. या घटनेमुळे, यवत गावातील आठवडा बाजार देखील बंद करण्यात आले. यावर, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'परिस्थिती नियंत्रणात आहे'.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
या प्रकरणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मी कार्यक्रमामध्ये होतो. मी माहिती घेतली. त्या ठिकाणी एका बाहेच्या व्यक्तीने हे चुकीचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे'.
नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, गुरुवारी यवत गावात गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची हिंदू जन आक्रोश सभा घेतली होती. यानंतर, शुक्रवारी सकाळी एका गटाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. या घटनेनंतर, दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास दोन गट आपआपसात भिडले. त्यामुळे यवतमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. या वादानंतर यवतमधील आठवडे बाजार बंद करण्यात आले. या दरम्यान, यवतमधील काही दुचाकी गाड्यांनाही पेटवले. तसेच, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.