Man Attacked by Stray Dogs in Pimpri-Chinchwad
Man Attacked by Stray Dogs in Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडच्या चिखली मोर वस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सात कुत्र्यांच्या टोळीने एका तरुणावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पीडित व्यक्ती एका अरुंद गल्लीतून कामाच्या ठिकाणी जाताना दिसत आहे.
अचानक मागून एक कुत्रा त्याच्यावर झेपावला. हल्ल्यामुळे तो घाबरला आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्याने कुत्र्याला दुचाकीच्या बाजूला ढकलले. पण इतक्यात इतर कुत्रेही त्याच्याकडे झेपावले. काही वेळाने स्थानिक लोक घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी तरुणाला वाचवले. भटक्या कुत्र्यांच्या या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो. मुलांना बाहेर पाठवतानाही भीती वाटते. महापालिकेने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
हेही वाचा - Marathi-Non Marathi Controversy : 'मराठी लोगों की औकात क्या?, तुम मराठी लोक भंगार हो'; म्हणणाऱ्या परप्रांतियाला मनसैनिकांनी चोपला
दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर देशभरातच चर्चा सुरू आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये हलवण्याच्या आदेशाविरोधात प्राणी कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्षेपानंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेशात बदल केला. नव्या निर्देशांनुसार, रेबीज झालेल्या किंवा आक्रमक वर्तन करणाऱ्या कुत्र्यांना वगळता, इतर सर्व कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून त्यांना त्यांच्या मूळ भागात परत सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा - Dams in Nashik District Overflowed: नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली; रेड-ऑरेंज अलर्टसह अनेक गावांना सतर्कतेचा इशारा
याशिवाय, न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यावर निर्बंध घातले असून, त्यासाठी समर्पित ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 नुसार कोणीही महापालिकेला कुत्र्यांना पकडण्यापासून रोखू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.