Python Electrocuted In Powai: पवई परिसरात रविवारी दुर्मिळ घटना घडली. आयआयटी मार्केटजवळ जवळपास नऊ फूट लांबीच्या अजगराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अजगर एका वीज बॉक्समध्ये आढळून आला. मात्र, नेमक्या कोणत्या परिस्थितीत अजगराला वीजेचा धक्का बसला याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृत अजगर ताब्यात घेतले असून त्याच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या कारवाईत रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) या संस्थेच्या बचावकर्त्यांनी वन विभागाला मदत केली. भारतीय रॉक अजगर ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित आहे. त्यामुळे अशा घटनांकडे संवेदनशीलतेने पाहिले जाते.
हेही वाचा - Maharashtra Rain Update : पुढील 24 तास धोक्याचे ! हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या
शहरी भागात वाढत्या बांधकामांमुळे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे अशा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या निवासस्थानाचे नुकसान होते. त्यामुळे ते अनेकदा मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पवईत घडलेल्या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, असे सरपटणारे प्राणी आढळल्यास घाबरून न जाता त्वरित वन विभाग किंवा RAWW सारख्या बचाव संस्थांना माहिती द्यावी.
हेही वाचा - History Of Dagdusheth Ganpati : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का ?
याआधी 20 ऑगस्ट रोजी मुलुंड परिसरात दहा फूट लांबीचा अजगर आढळून आला होता. अचानक मोठा अजगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मुसळधार पावसामुळे हा अजगर निवासी इमारतीत शिरला होता. मात्र, वन विभागाच्या समन्वयाने RAWW च्या पथकाने त्याची सुरक्षित सुटका केली. या अजगराला पुन्हा जंगलात सोडण्यात आले होते.