Sunday, August 31, 2025 11:12:44 AM

विरारमध्ये नाल्यात आधारकार्डांचा खच; नेमकं प्रकरण काय?

टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे विरार पश्चिमेच्या आगाशी  नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

विरारमध्ये नाल्यात आधारकार्डांचा खच नेमकं प्रकरण काय

जयराज राजीवाडे, प्रतिनिधी, पालघर : टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे विरार पश्चिमेच्या आगाशी  नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रांचे वितरण एक तर खासगी कुरिअर मार्फत होत असते किंवा टपाल खात्यामार्फत होत असते. अर्नाळा परिसरातील एका नाल्यात हजारो कागदपत्रांचा संच आढळला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय आयुर्विम्याची प्रमाणपत्रे, बँकांची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच अनेकांच्या मुलाखतीची पत्रे व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे.

लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला ही कागदपत्रे सापडली. नाल्याच्या कडेला तसेच पाण्यात पडलेली ही कागदपत्रे अनेक ठिकाणी खराब झाली आहेत. भिजली आहेत. ही कागदपत्रे ताब्यात घेतली, तेव्हा ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सामान्यांना मिळण्याऐवजी ती परस्पर कचऱ्यात फेकून दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र राज्यपालांनी विधिमंडळ अधिवेशनात केल्या मोठ्या घोषणा

टपाल खात्याच्या टपाल वितरणाची एक पद्धत ठरलेली असते. मुख्य टपाल कार्यालयातून उपटपाल कार्यालयात वितरणासाठी पत्रे जात असतात. उपटपाल कार्यालयातून ती पोस्टमन संबंधितांना देत असतो. टपाल कार्यालयाच्या क्षेत्रातील विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन त्याचे विभाग पाडलेले असतात. ठराविक विभागात ठराविक पोस्टमन त्याच्या त्याच्या क्षेत्रातील टपालाचे वितरण करीत असतो. 

अर्नाळा कार्यालयाची चौकशी व्हावी

अर्नाळा टपाल कार्यालयामध्ये ही पत्र गेली असण्याची शक्यता आहे. हा विभाग अर्नाळा टपाल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. ती वितरणासाठी पोस्टमनकडे दिली होती का आणि दिली असल्यास संबंधित पोस्टमन कोण, त्याने ती का वितरित केली नाहीत, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आधार कार्ड हे अनेकांच्या कागदपत्रांचे मूळ तसेच ओळखीचे महत्त्वाचे दस्तावेज आहे. असे असताना हे महत्त्वाचे कागदपत्र संबंधितांना वितरण करण्याअगोदरच त्याची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा : आनंदाचा शिधा योजना बंद होणार?

नोकरीचे स्वप्न कचऱ्यात

कागदपत्र वितरण न करता परस्पर विल्हेवाट लावून अनेकांच्या जीवनाशी खेळ खेळला गेला आहे. नाल्याच्या किनारी सापडलेल्या कागदपत्रात अनेकांना  पाठवलेली मुलाखतीची पत्रे आहेत. ही पत्रे मिळाली असती, तर अनेकांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले असते. परंतु हे पत्र संबंधितांना न देता त्यांच्या भवितव्याशी खेळ खेळला आहे. त्याचबरोबर अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकांनी पाठवलेली क्रेडिट आणि डेबिट कार्डही त्यात आहेत. याशिवाय अनेकांनी आपल्या भविष्याच्या तरतुदीसाठी आयुर्विमा उतरवला होता. आयुर्विम्याची प्रमाणपत्रे तसेच त्याची काही कागदपत्रे ही या टपालात होती. आपल्या भविष्याची पुंजी ठेवलेली कागदपत्रेच अचानक परस्पर गायब झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ज्यांनी सामान्यांच्या भावनांशी खेळ खेळला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री