Ganpati Visarjan 2025: मुंबईत शनिवारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. गिरगाव चौपाटी, जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनाची मोठी गर्दी झाली. विसर्जनाच्या नंतर किनाऱ्यावर निर्माण होणारी घाण व प्रदूषण टाळण्यासाठी रविवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बीएमसीच्या सहकार्याने सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, 'काल रात्री विसर्जन झाले आणि आज सकाळी आम्ही जुहू समुद्रकिनाऱ्यावर ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. आपला समुद्र स्वच्छ राहावा, घाण नसावी याची काळजी आपण घ्यायला हवी. आपण स्वतः घाण टाळली पाहिजे आणि जर घाण निर्माण झालीच तर ती स्वच्छ करणे ही आपली जबाबदारी आहे.'
हेही वाचा - Punjab Flood: 'ही सेवा आहे, देणगी नाही...'; पंजाबमधील पूरग्रस्त मदत कार्यासाठी अक्षय कुमारकडून 5 कोटींचे योगदान
अमृता फडणवीस यांनी पुढे सांगितले की, या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करणे नसून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. नागरिकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवून सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तथापी, या उपक्रमात अभिनेता अक्षय कुमारने देखील स्वतः झाडू हातात घेऊन सहभाग घेतला आणि उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांनी या मोहिमेचे कौतुक करत म्हटले की, विसर्जनानंतर किनारे स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
हेही वाचा - Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनाला गालबोट! पुणे जिल्ह्यात 4 जण बुडाले; दोघांचा शोध सुरू
स्थानिक नागरिक आणि बीएमसीचे अनेक कर्मचारीदेखील या स्वच्छता मोहिमेत सामील झाले. गणेशोत्सवाच्या दरम्यान निर्माण झालेला कचरा त्वरित साफ केल्यामुळे जुहू समुद्रकिनारा स्वच्छ करण्यास मोठी मदत झाली. मुंबईत दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील गणपती विसर्जनानंतर स्वच्छता मोहिमेद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.