Saturday, September 13, 2025 04:27:58 PM

AI Solved Crime Case : सख्खा मित्र बनला पक्का वैरी! पण का? AI ने शोधला आरोपी; स्टील कॅपने उलगडलं भयानक रहस्य

जंगलात पोलिसांना एक शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला. 24 तासांत त्याचं डोकंही मिळालं. मात्र, हा मृतदेह इतका विद्रुप होता की, त्याची ओळख पटवणं कठीण होतं. मग एआयच्या मदतीने..

ai solved crime case  सख्खा मित्र बनला पक्का वैरी पण का ai ने शोधला आरोपी स्टील कॅपने उलगडलं भयानक रहस्य

छत्रपती संभाजीनगर : 'कानून के हाथ लंबे होते हैं,' हा डायलॉग आपण चित्रपटात अनेकदा ऐकलाय. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. यात कायद्यासोबतच 'AI चे हातही लांब असतात,' हे समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी एक अतिशय गुंतागुंतीचे खून प्रकरण केवळ 9 दिवसांत सोडवले आणि एका आरोपीला तुरुंगात पाठवले आहे.

या प्रकरणाविषयी मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तहसीलमधील गौताळा अभयारण्याच्या जवळ असलेल्या सनसेट पॉइंटजवळ ही घटना घडली होती. येथील जंगलात 3 सप्टेंबरला पोलिसांना एका तरुणाचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला होता. 24 तासांत त्याचं डोकंही मिळालं. मात्र, हा मृतदेह इतका विद्रुप होता की, त्याची ओळख पटवणं कठीण होतं.  कारण प्रत्यक्षात हा खून 26 ऑगस्टला झाल्याचे आता समोर आले आहे. मात्र, पोलिसांना मृताच्या जबड्यात एक स्टील क्लिप मिळाली आणि तपासाला एक नवीन वळण मिळालं. या क्लिपमुळेच मृताची ओळख पटवणं शक्य झालं. 

या प्रकरणात एआय सिस्टीमच्या मदतीने, मृताच्या जबड्यावरील स्टील कॅपवरून आरोपीचा शोध घेण्यात आला आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तहसीलमधून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. स्टील क्लिपवरील तपशिलाच्या आधारे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (एआय) वापर करून क्लिपचं उत्पादन करणारी कंपनी, तिचे वितरक आणि राज्यातील वापराची ठिकाणं शोधून काढण्यात आली. ही क्लिप इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये निखिल हिरामण सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीला एका अपघातानंतर बसवण्यात आल्याचं निष्पन्न झालं. निखिल बेपत्ता असल्याची नोंद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये होती. घटनास्थळी आढळलेली अंतर्वस्त्रे, घड्याळ आणि क्लिपच्या आधारे कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली.

हेही वाचा - Kerala Crime : नशेत बेशुद्ध झालेल्या मित्राला मृत समजून गाडले; 6 वर्षांनी असा उघडकीस आला गुन्हा

निखिल हिराराम सूर्यवंशी (वय 28, रा. सिंधी, तालुका चाळीसगाव), असं मृत तरुणाचं नाव आहे. निखिल रोजंदारीवर शेतमजुरी करत होता. तो बकऱ्या चोरत असे. गावात गुंडगिरीही करत असे. त्याचे सर्व उद्योग त्याचा जिवलग मित्र श्रवण ज्ञानेश्वर धनगर याला माहीत होते. पोलीस तपासादरम्यान निखिलचे सर्व मित्र पोलिसांसमोर आले. मात्र, श्रवण आला नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. पण ही जिवलग मैत्री जीवघेण्या खुनापर्यंत कशी पोहोचली, ही यातील खरी गोम आहे.

जिवलग मैत्री अशी पोहोचली जीवघेण्या खुनापर्यंत
पोलिसांनी श्रवण याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. उलट तपासणीत श्रवण गडबडला आणि त्याने हत्येची कबुली दिली. 26 ऑगस्ट रोजी मैत्रिणीला भेटायचं असल्याचं सांगून मृत निखिल हाच दुचाकीने श्रवणला सायगावमार्गे सनसेट पॉइंटजवळ घेऊन गेला होता. "मी चोऱ्या, गुंडगिरी आणि व्यसनं करतो. तुला माझे उद्योग आणि कुकर्मे माहिती असल्याने माझी बदनामी होते. तू मेलास तरच माझं लग्न होईल. त्यामुळे मी तुला मारायचं ठरवलं आहे," असं म्हणत निखिलने श्रवणवर कुऱ्हाड उगारली. मात्र, श्रवणने वार चुकवत निखिलच्या गुप्तांगावर लाथ मारली. तो खाली कोसळताच श्रवणने त्याच कुऱ्हाडीने निखिलचं शीर धडापासून वेगळं केलं. 

100-150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले
एसपी राठोड म्हणाले की, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथकांनी 7 दिवस शिडी गावात तळ ठोकला आणि 100-150 सीसीटीव्ही फुटेज तपासले. निखिलचे नातेवाईक, शेजारी आणि मित्रांची चौकशी केल्यानंतर त्याचा जवळचा मित्र श्रवण धनगरवर संशय अधिकच वाढला. राठोड म्हणाले की, चौकशीनंतर श्रवणने हत्येचा गुन्हा कबूल केला. तो म्हणाला की, चोरी, गुंडगिरी आणि दारूच्या सवयीमुळे मृत निखिल गावात कुप्रसिद्ध झाला होता. बदनामीमुळे त्याचे लग्न होत नसल्याचा त्याला संशय होता. तसेच, ही बदनामी श्रवणमुळेच होत असल्याचे त्याला वाटत होते. 26 ऑगस्ट रोजी, सूर्यास्ताच्या वेळी निखिल श्रवणला सोबत घेऊन निघाला. जंगलात गेल्यानंतर, त्याने श्रवणवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. श्रवणने त्याच कुऱ्हाडीने त्याचा गळा कापून त्याचे डोके शरीरापासून वेगळे केले. एखाद्या पिक्चरमध्ये शोभावा, असा हा घटनाक्रम होता. आता श्रवण धनगर हा पोलिसांच्या ताब्यात आहे.

हेही वाचा - Crime in Extra Marital Affair: अनैतिक संबंधातून घडला भयानक प्रकार, पतीचा खून करायला आले पण बॉयफ्रेंडचा...


सम्बन्धित सामग्री