विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलं आहे. मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके आक्रमक आहेत. अशातच, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, 'मराठा आरक्षणाच्या विषयावर लोकांंनी आत्महत्या करायला सुरुवात केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लातूरात आत्महत्याच्या घटना घडत आहेत. इतर ठिकाणी सुद्दा मराठा समाजातील लोकांना आत्महत्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. त्यामुळे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर न बोलता त्यांनी या विषयावर सर्वप्रथम पत्रकार परिषद घेतली पाहिजे. आरक्षणाबाबत जनतेच्या मनात ज्या शंका आहेत, मग ते मराठा असतील, ओबीसी असतील किंवा किंवा अन्य समाज असतील, या विषयावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखठोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर येऊन विषय मांडले पाहिजे'.
मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळांनी गुरुवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. भुजबळ म्हणाले की, 'शिंदे समितीने 47 हजार 845 नोंदीचा अभ्यास करून 2 लाख 39 हजार 21 जात प्रमाणपत्र दिले आहेत. त्यामुळे, शासनिर्णय पुन्हा काढण्याची गरज नाही. जात प्रमाणपत्र हे जातीला दिले जाते, समाजाला नाही. कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे इतर ओबीसी जातीशी भेदभाव करणारा आहे'.