बीड: शेतकऱ्याच्या शेतातील 22 टन डाळिंब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. नेकनूर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केला आहे.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील शेतकरी सयाजी शिंदे यांच्या धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या डाळिंब बागेतून तब्बल 22 ते 23 टन डाळिंब रात्री चोरी केल्याचा प्रकार 10 दिवसांपूर्वी उघडकीस आला. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकऱ्याने नेकनूर पोलिसांकडे वारंवार विनवणी केली. तसेच अनेकवेळा पोलीस ठाण्यात चकरा मारल्या. मात्र नेकनूर पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. गुन्हा दाखल करून न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे. एका रात्रीत एवढी मोठी चोरी होऊ शकत नाही. 10 ते 12 टनापर्यंतची योग्य तक्रार दिल्यास आम्ही गुन्हा नोंद करून तपास करू असं सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: Ashadhi Wari 2025: राज्यात आषाढी एकादशीचा जल्लोष
नेमकं घडलं काय?
बीड तालुक्यातील चौसाळा येथील शेतकरी सयाजी शिंदे यांच्या डाळिंब बागेतून तब्बल 22 ते 23 टन डाळिंब रात्रीत चोरी केल्याचा प्रकार 10 दिवसांपूर्वी घडला. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकऱ्याने नेकनूर पोलिसांकडे वारंवार विनवणी करत अनेक चकरा मारल्या. मात्र नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी आपण एवढ्या मोठ्या चोरीची नोंद घेऊ शकत नाहीत असे सांगितले. तर तुम्हाला काय करायचे ते करा अशी भाषा वापरल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. यानंतर शेतकऱ्याने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार घेण्याची विनंती केली. यावर पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे फोनवरून आदेश दिले. तरीसुद्धा चार दिवसांपासून गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. गुन्हा दाखल करून न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसणार असल्याचं शेतकऱ्याने सांगितलं आहे.