Beed Crime Satish Bhosle: बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला सतीश भोसले उर्फ ‘खोक्या भाई’ अखेर अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करताना दिसतोय. या प्रकरणावर आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्या भाईने अखेर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, तो पुराव्यासह पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
खोक्या भाईचे आणखी काही प्रताप समोर
सतीश भोसले याने बुलढाणा जिल्ह्यात एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्याकडून सोन्याचे दागिने घालून हेलिकॉप्टरमधून उतरतानाचे व्हिडिओ देखील समोर आले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतल्यावर वन विभागाला शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, हत्यारे, तसेच संशयास्पद वाळलेले मांस आढळले.याशिवाय दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना कुऱ्हाड व सत्तूरने मारहाण केल्याच्या गुन्ह्यात त्याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात शिरूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत.
हेही वाचा: Beed Crime Satish Bhosle: खोक्या भाईचं परखड उत्तर,'लोक बायांवर उधळतात, मी मित्रासाठी केलं तर काय बिघडलं?'
गेल्या पाच वर्षांत सतीश भोसलेने राजकीय व सामाजिक वर्तुळात स्वतःची ओळख निर्माण केली होती. भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या पदावर कार्यरत राहिलेल्या खोक्या भाईने पारधी समाजासाठी सामाजिक कामे केली. मात्र, सुरेश धस यांच्या संपर्कात आल्याने त्याचा दबदबा वाढला आणि त्याचे नाव गुन्हेगारी विश्वात गुंतत गेले.
दरम्यान, या प्रकरणानंतर शिरूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला असून, सतीश भोसले याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता न्यायालयाचा निर्णय आणि पोलिसांची पुढील कारवाई काय राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.