Tuesday, September 16, 2025 07:34:57 PM

Maharashtra Local Body Election Date: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट! 'या' महिन्यात पार पडणार निवडणुका

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले असून, 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रलंबित निवडणुका पूर्ण करा, असा आदेश जारी केला आहे.

maharashtra local body election date स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट या महिन्यात पार पडणार निवडणुका

Maharashtra Local Body Election Date: महाराष्ट्रात बराच काळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर निर्णायक घडामोड घडली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले असून, 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रलंबित निवडणुका पूर्ण करा, असा आदेश जारी केला आहे.

निवडणुकांच्या तारखेबाबत अंतिम निर्णय

जिल्हा परिषदा, महानगरपालिका, पंचायत समित्या यांसह अनेक स्थानिक संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशी संबंधित निकालामुळे या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या होत्या. याआधी न्यायालयाने मे 2025 मध्ये चार महिन्यांत निवडणुका घेण्याची मुदत दिली होती. मात्र, पावसाळा आणि प्रशासनिक कारणांमुळे त्या वेळेत निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

न्यायालयाच्या सूचना

सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाने EVM उपलब्धता, बोर्ड परीक्षा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता या अडचणी मांडल्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बोर्ड परीक्षेचे कारण फेटाळून लावले आणि उर्वरित दोन मुद्द्यांवर आयोगाला वेळेत तयारी करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार, प्रभाग रचना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. तसेच EVM पुरवठा नोव्हेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करणे आवश्यक असेल. 

हेही वाचा - Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय, एनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी आणि...

34 जिल्हा परिषदांतील आरक्षण जाहीर

दरम्यान, निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. रायगड, नाशिक, जळगाव, पुणे यांसह काही जिल्ह्यांत सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर आदी ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. तलेच सोलापूर, नागपूर, भंडारा येथे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जागा पुरुष मागास प्रवर्ग उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. 

हेही वाचा - Raj Thackeray On Dashavatar Movie : राज ठाकरेंनी केलं दशावतार चित्रपटाचं कौतुक; म्हणाले, 'जमिनी वाचवा, कारण तुमचं अस्तित्व...'

याशिवाय, रत्नागिरी, धुळे, सातारा, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांत महिला मागस प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत पार पडणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष लवकरचं निवडणुकीच्या तयारी लागतील. 


सम्बन्धित सामग्री