विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: जालन्यातील भोकरदन तालुक्यांमधील पारध येथे पतीने पत्नीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून पत्नीची हत्या केली. यानंतर स्वतः ही गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारध गावात अत्यंत दुर्देवी घटना घडली. समाधान आल्हाट यांनी आपल्या पत्नीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने वार करुन तिला जागीच ठार केले. किर्ती आल्हाट असे पत्नीचे नाव होते. ती 23 वर्षाची होती.
पत्नी खूनामागचे कारण अस्पष्ट
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे शनिवारी हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून समाधान अल्हाट यांने पत्नी कीर्तीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. समाधान व कीर्ती यांच्या विवाहाला पाच वर्षे झाली होती. दाम्पत्याला दोन वर्षांची स्वामीनी व पाच वर्षाचा रुद्र अशी दोन लहान अपत्ये आहेत. काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये वाद आणि भांडणे सुरू असल्याची माहिती मिळाली. कीर्ती काही दिवसांपूर्वी सिल्लोडतील वसई येथे माहेरी गेली होती. समाधान अल्हाट याने तिला पाच-सहा दिवसांपूर्वी जबरदस्तीने पारध येथे आणल्याचे समजते. मात्र पत्नीला ठार मारण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा: Uttar Pradesh: 35 लाखांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून विवाहितेची हत्या; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना
किर्तीची आई घरी आल्याने घटना उघड
समाधान कीर्तीसोबत सतत वाद घालत होता. नुकतचं पोळ्याच्या सणाच्या दिवशी देखील त्याने पत्नीला मारहाण करुन शिवीगाळ केली होती. हा संपूर्ण प्रकरण कीर्तीने आपल्या आईला दूरध्वनीवरुन सांगितले होते. यानंतर शनिवारी दुपारी कीर्तीची आई तिच्या घरी आली. त्यावेळी तिला हा सगळा प्रकार लक्षात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पारध परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, निष्पाप दोन बालकांचे भवितव्य अंधारमय झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पारध पोलिस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. भोकरदनच्या उप विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.