Monday, September 01, 2025 01:19:00 AM

चिमुरडीवर अत्याचार; मैत्रिणीने केला खळबळजनक खुलासा

मुंब्रा परिसरात का निष्पाप चिमुकलीवर खेळण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

चिमुरडीवर अत्याचार मैत्रिणीने केला खळबळजनक खुलासा

मुंबई: मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात घडलेली ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. अवघ्या 10 वर्षांच्या एका निष्पाप चिमुकलीवर खेळण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना एक अज्ञात तरुण तिला खेळणी देण्याचं आमिष दाखवत एका इमारतीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा जीव घेतला. तिच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने ती हादरून गेली होती.


इमारतीच्या डक्टमध्ये आढळला मृतदेह:

रहिवाश्यांना इमारतीमधील खिडकीच्या डक्टमधून सतत येणाऱ्या आवाजांमुळे संशय आला. जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा डक्टमध्ये अर्धवट कपडे घातलेला चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला, तेव्हा चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.


पीडितेच्या मैत्रीणीने सांगितली हकीकत:

पीडितेच्या मैत्रीणीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आणि शेवटी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून आसिफ मन्सूरी नावाच्या 19 वर्षीय तरुणाला अटक केली. पोलिसांनी जेव्हा त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पीडित मुलीची मैत्रीणही त्याला ओळखून म्हणाली, 'हाच माझ्या मैत्रिणीला फसवणारा आहे'. 


पीडितेच्या कुटुंबियांचा दावा:

या प्रकरणात, पीडितेच्या कुटुंबियांनी अजून एक गंभीर आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की आरोपी एकटा नव्हता, त्याच्यासोबत इतर लोकही होते आणि तो त्यांची नावं लपवत आहे. चिमुकलीचा गळा फाडलेला होता, खिडकीची काच तोडून तिचा मृतदेह बाहेर फेकण्यात आला होता. या अमानुष कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पीडितेच्या भावाने म्हटलं, 'आमच्या बहिणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाली आहे. अशा नराधमाला फाशी झालीच पाहिजे. नसेल शक्य तर त्याला आमच्या ताब्यात द्या'. 


सम्बन्धित सामग्री