मुंबई: मुंबईतील माझगाव परिसरात एक धक्कादाक घटना घडली आहे. मंगळवारी डॉकयार्ड रेल्वे स्टेशन एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळी पोहोचून जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. यासह, नेमकं कोणत्या कारणामुळे, ही हत्या झाली असावी? याचाही त्यांनी पर्दाफाश केला आहे. तरूणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या मामासह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, केशव कुमार (वय: 28) हा बिहारचा रहिवासी होता. मागील दोन आठवड्यांपासून केशव कामाच्या शोधात मुंबईत आला होता. यादरम्यान, केशव त्याच्या मामासोबत म्हणजेच मृत्युंजय झा यांच्यासोबत मुंबईतील माझगाव येथे राहत होता. यासह, केशव माझगाव येथील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. केशवच्या गावातील सनी कुमार चौधरी आणि गिरीधारी रॉय हे देखील याच परिसरात राहत होते.
सोमवारी रात्री, केशव त्याच्या मामासोबत आणि दोन मित्रांसोबत मद्यपान करत होता. यादरम्यान, बिहारमधील एका जमिनीच्या जुन्या वादातून तिघांमध्ये वाद झाला. तेव्हा, त्या तिघांनाही राग अनावर झाला आणि त्यांनी केशववर हल्ला केला. इतकंच नाही, तर मृत्युंजय झा यांनी केशवच्या मानेवर पाय ठेवले आणि त्याचा गळा दाबला. यादरम्यान, केशवचा जागीच मृत्यू झाला. तसेच, केशवची हत्या केल्यानंतर, तिघांनी त्याचा मृतदेह सोसायटीच्या ड्रेनेज टॅंकमध्ये फेकून दिला. या घटनेनंतर, सनी कुमार चौधरी आणि गिरीधारी रॉय भुसावळला पळून गेले. यादरम्यान, केशवचा मामा मृत्युंजय झा मुंबईतच होता.
जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा पोलिसांना मृत्युंजय झा यांच्यावर संशय आला. यानंतर, पोलिसांनी मृत्युंजय झा यांची सविस्तर चौकशी केली असता मृत्युंजय झा यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यासोबतच, भुसावळला पळून गेलेले सनी कुमार चौधरी आणि गिरीधारी रॉय हे देखील पोलिसांना सापडले. पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पुढील तपास सुरू आहे.