पुणे: पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. नुकतेच भाजपचे आमदार अमित गोखले यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वेगवेगळ्या स्तरातून आरोप - प्रत्यारोप होत आहेत. अशातच, दीनानाथ रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत माहिती दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत दिली माहिती:
2001 मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि गरीब रुग्णांसाठी समर्पित केलेल्या सेवेमुळे आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालय एक विश्वासार्ह वैद्यकीय संस्था म्हणून ओळखले जाते. दरवर्षी हजारो शस्त्रक्रिया आणि लाखो रुग्णसेवा करत असलेले हे रुग्णालय अनेक वेळा आपत्तींच्या काळातही पुढे सरसावले.
मात्र नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर काही असंवेदनशील व्यक्तींनी रुग्णालयावर टीका केली आणि प्रत्यक्ष नुकसानही केले. या पार्श्वभूमीवर, रुग्णालयाने आत्मचिंतन करत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून कोणत्याही आपत्कालीन रुग्णाकडून अनामत रक्कम घेण्यात येणार नाही. इमर्जन्सी, डिलिव्हरी आणि बालरोग विभागातील रुग्णांना याचा थेट लाभ मिळणार आहे. त्यासोबत रुग्णालयाने हे स्पष्ट केले आहे की, जे घडले ते अत्यंत दुर्दैवी होते. पण त्यातून संवेदनशीलतेचा अभाव टाळण्याची आणि रुग्णप्रथम दृष्टिकोन ठेवण्याची नव्याने सुरुवात होईल. या निर्णयाची नोंद सर्व जनतेने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे आवाहनही विश्वस्त मंडळाने केले आहे.
वेळीच उपचार न झाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू:
गुरुवारी, पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हृदयद्रावक घटना घडली. अमित गोखले यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांनी त्यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे सात महिन्यांची गर्भवती होती. त्या प्रचंड रक्तस्रावात वेदनांमध्ये विव्हळत होत्या. त्यामुळे सुशांत भिसे यांनी आपल्या पत्नीच्या उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेऊन आले. मात्र, अशा परिस्थितीत या नामांकित रुग्णालयाने '10 लाख रुपये भरले तरच रुग्णालयात दाखल करून घेऊ', अशी भूमिका घेतली. कुटुंबाने 3 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली. मात्र, रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिला. शेवटी तनिषा भिसे यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि तिथे त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांचे बाळ सुखरूप आहेत. पण दुर्दैवाने, तनिषा भिसे यांच्या उपचाराला उशीर झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.