Sunday, August 31, 2025 04:47:32 AM

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना 2.8 कोटींचे अनुदान मिळणार

आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रति दिंडी 20,000 रुपये या प्रमाणे 2 कोटी 80 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना 28 कोटींचे अनुदान मिळणार

मुंबई: आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रति दिंडी 20,000 रुपये या प्रमाणे 2 कोटी 80 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील 14 जून आणि 17 जून 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

वारी अनुदानासाठी निधी हा अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात व प्रसिद्धी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 'स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविणार'

आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय. 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो.

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागास्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.


सम्बन्धित सामग्री