उल्हासनगर: वैद्यकीय क्षेत्रात मानवी जिवाची जबाबदारी अत्यंत महत्वाची मानली जाते. मात्र उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमधून समोर आलेली एक धक्कादायक घटना ही जबाबदारी किती हलक्याफुलक्या पद्धतीने घेतली जाते, याचा गंभीर पुरावा ठरत आहे. अभिमान तायडे (वय 65) या जिवंत असलेल्या व्यक्तीस एका डॉक्टरने तपासणी केल्याशिवाय मृत घोषित करून थेट डेथ सर्टिफिकेट दिल्याची घटना उघड झाली आहे.
अभिमान तायडे यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावत होती. उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांच्या मुलाने तातडीने त्यांना रिक्षातून उल्हासनगर येथील शिवनेरी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात डॉक्टर डॉ. आहुजा यांनी रुग्ण रिक्षामधून उतरवून तपासणी करण्याऐवजी, रिक्षामध्येच प्राथमिक पाहणी करून त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा: गोंदिया शासकीय आश्रम शाळेतील नर्स भरतीत मोठा घोटाळा; स्थानिक उमेदवारांचा आरोप
डॉक्टरांच्या या निर्णयावर विश्वास ठेवून रुग्णालय प्रशासनाने तत्काळ मृत्यू प्रमाणपत्र (डेथ सर्टिफिकेट) जारी केले. अभिमान तायडे यांच्या नातेवाईकांनीही डॉक्टरांवर विश्वास ठेवत त्यांना घरी नेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, तयारी सुरू असतानाच नातेवाईकांच्या लक्षात आले की अभिमान यांच्या छातीत अजूनही हालचाल होत आहे, आणि त्यांच्या हृदयाची धडधड जाणवत आहे.
यानंतर तातडीने त्यांना पुन्हा उल्हासनगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी वेळीच उपचार सुरू केले आणि काही वेळातच अभिमान तायडे शुद्धीवर आले. या घटनेमुळे नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला, परंतु त्यांच्या मनात राग, संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली.
या संपूर्ण प्रकरणात डॉ. आहुजा यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी सांगितले की, 'रुग्णाची नस मिळत नव्हती आणि आजूबाजूला प्रचंड गोंगाट होता. त्यामुळे हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत. त्यामुळे चुकून मृत घोषित केले गेले. याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो.'
हेही वाचा: International Campuses in India: विदेशी शिक्षण देशातच; 'या' पाच नामांकित युनिव्हर्सिटी भारतात सुरू होणार
मात्र, केवळ 'खेद व्यक्त' करून इतक्या गंभीर प्रकारातून डॉक्टर सुटू शकतात का? हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ही घटना केवळ एका रुग्णापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित डॉक्टर व रुग्णालय प्रशासनावर काय कारवाई केली जाईल, याकडे संपूर्ण उल्हासनगरवासियांचे आणि राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात जबाबदारी, तत्परता आणि मानवी जिवाचा आदर किती गरजेचा आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.