सोलापूर: शहरातील नव्याने सुरू झालेल्या महिला व बाल रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सिझेरियन प्रसूतीनंतर टाके काढण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका महिलेला केस पेपर नसल्याने उपचार नाकारल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून करण्यात आला आहे.
संबंधित महिला हेमलता सोळंकी, मूळची उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावची असून, दहा दिवसांपूर्वीच तिची सिझेरियन प्रसूती झाली होती. सोमवारी सायंकाळी ती पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील महिला व बाल रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिला पोटात टाके असल्याने बसणे आणि चालणे कठीण जात होते. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 'केस पेपर नसल्यास उपचार मिळणार नाही,' असे सांगून तिला बाहेर ताटकळत ठेवले, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
हेही वाचा: पुणे हादरलं! 25 वर्षीय तरुणीवर घरात घुसून बलात्कार
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये पीडित महिला आणि तिची आई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. त्यांनी सांगितले की, वेदनेने व्याकुळ असलेल्या महिलेला बसण्यासाठीही जागा देण्यात आली नाही. केवळ केस पेपर नसल्याने तिला काही वेळ रांगेत उभे राहावे लागले.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता, महिला व बाल रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. जयश्री ढवळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, 'महिलेवर आम्ही वेळेवर उपचार केले असून तिला योग्य वेळेत डिस्चार्जही दिला आहे. सोशल मीडियावर केलेले दावे चुकीचे आणि खोटे आहेत.' दरम्यान, ही घटना पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयांतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे