भंडारा: भंडारा जिल्ह्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला डॉक्टर किंवा परिचारिकेऐवजी थेट सफाई कामगाराने इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर या इंजेक्शनसाठी वापरलेली सिरिंजही दूषित असल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री हेमराज काशीकर या महिला रुग्णाला ताप व थंडीच्या आजारामुळे लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना, परिचारिका किंवा डॉक्टरांऐवजी रुग्णालयात काम करणाऱ्या सफाई कामगार महिलेनंच रुग्णाच्या हातात सलाइन लावण्याचा आणि इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. रुग्णाने याबाबत आक्षेप घेतल्यावर आणि दूषित सिरिंज वापरण्याची तक्रार केल्यावरही संबंधित कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे, तर परिचारिकेने उद्धटपणे 'ओरडू नकोस, शांत बस' अशी प्रतिक्रिया दिल्याचा गंभीर आरोप रुग्णाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा: Ratnagiri Crime : 'ती' आजही नकोशी! जन्मदात्या आईनेच घेतला आपल्या मुलीचा जीव; कारण ऐकून व्हाल थक्क
अशा प्रकारे वैद्यकीय शिक्षण नसलेल्या सफाई कामगाराकडून रुग्णाला इंजेक्शन देणे हे नियमबाह्य व जीवघेणे ठरू शकते. दूषित सिरिंज वापरल्याने हिपॅटायटिससारखे घातक आजार किंवा इतर संसर्गजन्य रोगांचा धोका रुग्णाच्या जीवनाला निर्माण होतो. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लाखनीसारखी सरकारी रुग्णालये हा मोठा आधार असतो. परंतु, अशा धक्कादायक घटनांमुळे आरोग्यसेवेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'जर सफाई कामगारालाच इंजेक्शन द्यायची परवानगी असेल तर मग डॉक्टर-परिचारिका कशासाठी?' असा सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा:Samay Raina Controversy: लॅटेन्टचा वाद पुन्हा पेटला? सुप्रीम कोर्टाने समय रैनासह इन्फ्लुएन्सर्सना फटकारलं; ‘वाट्टेल ते बोलणं म्हणजे स्वातंत्र्य...
माध्यमांमधून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित सफाई कामगारावर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मात्र, घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं का होतं? हा मूलभूत प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
आरोग्य सेवा ही ग्रामीण भागात जीवनरेषा मानली जाते. तिथेच अशा प्रकारचे निष्काळजी वर्तन होत असेल तर इतर भागातील रुग्णालयांमध्ये काय चालते याची शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे फक्त लाखनी नाही तर राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांमध्येही तपासणी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, कर्मचाऱ्यांची कमतरता, तसेच प्रशासनाची जबाबदारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.