अजय घोडके. प्रतिनिधी. लातूर: लम्पीचा शिरकाव झाल्याने लातूर जिल्ह्याच्या 12 गावात 47 जनावरांना 'लम्पी' या चर्मरोग आजाराची लागण झाली असून दोन जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाने दिले आहे. जवळपास वर्षभरापूर्वी, लातूर जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनात लंपी या चर्मरोग आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला होता. आता जिल्ह्यातील उदगीर,अहमदपूर देवणी,लातूर या चार तालुक्यातील 47 जनावरांना क्वारंटाईन करण्यात आले असून दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: Solapur Crime : घरगुती वाद टोकाला, शेतात पत्नीची हत्या; पतीने फरशी डोक्यात घातली
सन 2022-23 पासून लातूर जिल्ह्यात लंपी या चर्मरोग आजाराचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला या आजाराने जिल्ह्यातील जवळपास 630 जनावरे दगावली होती. त्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पशुधनाला लसीकरणाची मोहीम गतिमान केली. त्यामुळे लंपी आजाराचा जिल्ह्यातील प्रादुर्भाव कमी झाला होता. परंतु, सध्या जिल्ह्यात रिमझिम होत असलेल्या पावसामुळे माशा,डासांची पैदास निर्माण झाल्याने लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे.
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील वरवटी,धसवाडी, कोंडगाव,ब्रह्मपुरी,शिंदगी उदगीर तालुक्यातील हेर, डोंगरशेळकी, देवर्जन लातूर तालुक्यातील बोरवटी, खुलगापूर, सलगरा, देवणी तालुक्यातील अंबानगर गोशाळा अशा एकूण 12 गावातील 47 बाधित पशुधनापैकी 2 पशुधन दगावली आहेत. जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनासाठी एक लाख 76 हजार 500 लसी उपलब्ध झाल्या असून 17 हजार लसी शिल्लक आहेत. प्रत्येक बाधित गावात तात्काळ पोहोचून प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे शीघ्र कृतीदल कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्रीधर शिंदे यांनी सांगितले आहे.