Sunidhi Chauhan: वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच असतं. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथ आणि पाठिंबा किती महत्त्वाचा असतो, याची जाणीव प्रत्येक मुलीला नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारित एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी गायलं आहे.
'का रे बाबा… का रे पप्पा
कुठे हरवल्या तुझ्या छानछान गप्पा…
तू सांग ना, तू सांग ना…
तू सांग ना… हा माझ्या बाबा…'
अशा भावस्पर्शी ओळींनी सजलेलं हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिलं असून, श्रेयस देशपांडे यांनी त्याला संगीत दिलं आहे.
बाप-लेकीचं हृदयस्पर्शी नातं उलगडणारं ‘अवकारीका’ चित्रपटातील हे गाणं, आपल्या आयुष्यात वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्या आयुष्यासाठी घेतलेले कष्ट यांची जाणीव करून देतं. येत्या फादर्स डे निमित्त हे गीत वडील-मुलीच्या नात्यासाठी एक सुंदर भेट ठरेल.
'हे गाणं गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांच्या अंतर्मनाला नक्कीच स्पर्श करेल,' असा विश्वास गायिका सुनिधी चौहान यांनी व्यक्त केला.
रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येणारा ‘अवकारीका’ चित्रपट 1 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केलं असून, निर्मिती भारत टिळेकर आणि अरुण जाधव यांनी केली आहे. सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे आणि गीता सिंग यांची आहे.