Monday, September 01, 2025 05:54:34 PM

सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. वळसंगकरांनी स्वतःवरच झाडली गोळी, उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोमवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ वळसंगकरांनी स्वतःवरच झाडली गोळी उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर: सोलापूरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोमवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी दोन वेळा गोळीबार केला असून त्यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात आरपार गेली. ही घटना त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये घडली. तातडीने त्यांना वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठा शोककळा पसरली आहे.

डॉ. वळसंगकर यांनी रात्री साडेआठच्या सुमारास ही टोकाची कृती केल्याची माहिती आहे. गोळी झाडल्यानंतर त्यांचा आवाज ऐकून घरातील सदस्यांनी धाव घेतली आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पाहून तातडीने रुग्णालयात हलवलं. परंतु गोळी गंभीर स्वरूपात लागल्यामुळे डॉक्टरांचे प्राण वाचवण्यात यश आलं नाही. त्यांच्या रुग्णालयात ही बातमी कळताच, रुग्णांच्या नातेवाईकांनी आयसीयू बाहेर गर्दी केली. अत्यंत नम्र स्वभावाचे आणि अनुभवी डॉक्टर म्हणून त्यांचा लौकिक होता, त्यामुळे ही घटना अधिकच वेदनादायक ठरली आहे. 

डॉ. शिरीष वळसंगकर हे फक्त सोलापूर नव्हे तर महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही वैद्यकीय सेवा देणारे अत्यंत आदरणीय डॉक्टर होते. त्यांनी सोलापूरच्या डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि नंतर शिवाजी विद्यापीठ तसेच लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदव्या संपादन केल्या होत्या. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि कन्नड अशा चार भाषांमध्ये संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य होतं. त्यांनी हजारो रुग्णांना नवजीवन दिलं, पण दुर्दैवाने त्यांच्या जाण्याने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.


सम्बन्धित सामग्री