छत्रपती संभाजीनगर : महायुतीकडून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल, ही आशा असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागते की काय? अशी परिस्थिती आहे. अद्यापही कर्जमाफी झालेली नाही तर जिल्ह्यातील हजारो शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित आहेत.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागतो. यंदा महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सहा महिने उलटून देखील महायुतीकडून कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरतेय, त्यामुळे शेतकरी हातबल बनलंय. सरकारनं लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा थेट राजकीय लोकांना गावबंदी करू असा थेट इशाराच शेतकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा : शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी; शिक्षक आमदार अडबालेंची मागणी
शेतकरी आत्महत्या ह्या वर्षानुवर्ष महाराष्ट्रात सुरू आहेत, सरकार हे शेतकऱ्याचं मायबाप समजलं जातं, मात्र या सरकारकडून निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन दिलं, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी न दिल्यामुळे 15 एप्रिलला शेतकरी संघटनेनं सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली होती. अजूनही सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर बोलायला तयार नाही, त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे कैलास तवार यांनी दिला आहे.
जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. त्या शेतकऱ्याची आज बिकट अवस्था लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. आता राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.