मुंबई: केंद्र सरकारने जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) कलेक्शनची ताज्या आकडेवारी जाहीर केली आहे. डिसेंबर 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.77 लाख कोटी रुपये इतका झाला आहे, जो 7.3 टक्क्यांची वाढ दर्शवितो. गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.65 लाख कोटी रुपये होते. सलग दहाव्या महिन्यात जीएसटी कलेक्शन 1.77 लाख कोटी रुपयांच्या वर राहिलं आहे, ज्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.
जीएसटी कलेक्शनमध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की, डिसेंबर महिन्याच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली असली तरी, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 2.1 लाख कोटी रुपये पार झाले होते. त्यानंतरच्या तीन महिन्यांच्या कलेक्शनमध्ये किंचित घट झाली आहे. मात्र, डिसेंबर 2024 च्या तिमाहीतील कलेक्शन पूर्वीच्या तिमाहीपेक्षा चांगलं राहिलं आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत सरासरी जीएसटी कलेक्शन 1.82 लाख कोटी रुपये इतकं राहिलं, जे जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीच्या सरासरी 1.77 लाख कोटींच्या तुलनेत 8.3 टक्क्यांनी अधिक आहे.
महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक जीएसटी कलेक्शन केले आहे. महाराष्ट्रातून 29260 कोटी रुपये जीएसटी जमा झाले, जे 2023 मध्ये 26814 कोटी रुपये होते. महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये 14,622 कोटी रुपये, तामिळनाडूत 11,792 कोटी रुपये, गुजरातमध्ये 10,204 कोटी रुपये आणि हरियाणामध्ये 7,149 कोटी रुपये जीएसटी जमा झाले आहेत.