मुंबई : वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. परंतु ठाकरे गटाने विधेयकाला विरोध केला आहे. आर्थिक संकटावर दुर्लक्ष व्हावं, म्हणून वेगवेगळे विषय काढले जात आहेत. देशवासियांना विश्वासात घेतलं असतं तर आम्ही एकमुखानं पाठिंबा दिला असता. भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
'वक्फच्या जमिनींवर भाजपाचा डोळा'
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले. या विधेयकावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. यावेळी विधेयकावर मतदान घेण्यात आले. त्यावर 288 मतांनी समर्थन आणि 232 मतांनी विरोध नोंदवला गेला. याच विधेयकावर ठाकरे गटाने विरोध दर्शवला. रिजिजूंनी एकेकाळी गोमांसाचं समर्थन केलं होतं. गोमांसाचं समर्थन करणाऱ्या रिजिजूंनी काल वक्फ विधेयक मांडलं. वक्फ विधेयकातील काही सुधारणा खरंच चांगल्या आहेत. वक्फच्या जमिनींवर भाजपाचा डोळा असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा : वक्फच्या समर्थनामुळे ठाकरेंवर उपमुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टीका
'वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे, तर तुम्ही हिंदुत्व सोडले का?'
पुढे बोलताना, 370 कलम हटवलं तेव्हा आम्ही समर्थन दिलं होतं. मोहम्मद अली जिना यांना जे जमले नाही, ते भाजपने केले. वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे, तर तुम्ही हिंदुत्व सोडले का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे. शाहांचं कालचं भाषण जिनांनाही लाजवणारं होतं. मुस्लिमांचं लांगुलचालन सुरू असताना गद्दार शेपूट घालून बसले होते का? असा प्रश्न त्यांनी शिंदेंना केला. तसेच आम्ही काय खावं यावर जर बंधनं लादणार असाल तर गप्प बसणार नाही. वक्फ विधेयकावर बोलताना अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या जागेवरही वक्फ बोर्डाने दावा केला असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना संसदेच्या जागेवर वक्फ बोर्डाचा दावा ही केवळ लावालावी असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
'भाजपानं आता जुमलेबाजी बंद करावी'
भाजपानं आता जुमलेबाजी बंद करावी. भाजपानं गरिबांमध्ये मारामाऱ्या लावणं बंद करावं. बाळासाहेबांनी मुस्लिमांना कधीही गद्दार म्हटलेलं नाही. आम्ही वक्फ विधेयकाला नाही तर भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध केला असल्याचे उद्धव यांनी सांगितले आहे. आज मुस्लिमांच्या जमिनींवर डोळा, उद्या इतर धर्मियांच्याही ठेवतील. भाजपाचा मित्रांच्या घशात वक्फच्या जमिनी घालवण्याचा प्रयत्न असल्याची जोरदार फटकेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.