पुणे: सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याशी संबंधित वाद चांगलाच तापलेला आहे. कामराने गायलेल्या गाण्यावरून शिंदे गट आक्रमक झाला असताना, आता पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंना व्यंगचित्राच्या माध्यमातून डिवचण्यात आलं आहे.
पुण्यातील अलका चौकात ठाकरेंच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र झळकत आहे, ज्यामध्ये त्यांची दाढी ओढली जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या बॅनरवर 'ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का?' असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा: 'गद्दार' गाणाऱ्या कुणाल कामराला जागतिक पाठिंबा – दोन दिवसांत 4 कोटींची मदत!
दुसरीकडे, कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर गायलेल्या गाण्यावरून सुरू झालेला वाद अधिकच तीव्र झाला आहे. शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी खार येथील युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कामराच्या शोचा सेट उद्ध्वस्त केला होता. या प्रकरणावरून खार पोलिसांनी कुणालविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. आता पुन्हा एकदा त्याला 1 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.