जालना : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. नवीन सरकार येऊन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. पण अद्याप खाते वाटप झाले नाही. येत्या दोन दिवसांत खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन करणार असल्याची हाक दिली आहे. येत्या 25 जानेवारीला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढणार असल्याचे चित्र आहे.
आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर येत्या 25 जानेवारीला उपोषण करू असे मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 25 जानेवारीपर्यंत आमच्या मागण्या केल्या नाहीत तर सरकारवर पश्चाताप करण्याची वेळ येईल असे मराठा आंदोलक जरांगे यांनी म्हटले आहे.
गरीब मराठ्यांनी आंदोलन हातात घ्यावं
25 जानेवारीला मराठ्यांनी आंतरवाली सराटीत यावे आणि आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठ्यांना केले आहे. ज्यांना उपोषण करायचे नसेल त्यांनीही येऊन पाठिंबा द्यावा असेही जरांगेंनी म्हटले आहे. गरीब मराठ्यांनी आंदोलन हातात घ्यावे. यासाठी मराठ्यांनी गावागावात बैठका घ्या, पत्रिका छापा आणि लोकांमध्ये वाटा. अशाप्रकारे लोकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण द्या असेही जरांगे यांनी मराठ्यांना सांगितले आहे. 25 जानेवारीला कुठलेही कार्यक्रम घेऊ नये असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे.
सरकार मराठ्यांना वेठीस धरतंय
मराठ्यांनी पुन्हा एकदा ताकद दाखवा. सरकार मराठ्यांना वेठीस धरत आहे. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर 25 जानेवारीला उपोषणाला बसणार आहे. त्याआधी सरकारने मागण्या मान्य कराव्या असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.