बुलढाणा: बुधवारी सकाळी 8:30 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. मुंबईतील मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या मुद्द्यावर मुस्लिम नेते आणि उच्च पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी असे निर्देश दिले की, 'मशिदीबाबत पोलिसांनी कोणतीही चुकीची कारवाई करू नये'. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या निर्देशावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा: SHARAD PAWAR: हिंदी सक्तीवर शरद पवार काय म्हणाले?
भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले:
'महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे बंदचा कायदा लागू राहील. यामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही', असा टोला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे. जेव्हा किरीट सोमय्यांना मशिदीवरील भोंग्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा सोमय्या म्हणाले की, 'महाराष्ट्राचे महायुती सरकार न्यायालयाचा आदर करते. राजीव गांधी सरकारच्या काळातही ध्वनी प्रदूषण कायदा अस्तित्वात होता. हा कायदा गणपतीला लागू झाला. त्यानंतर नवरात्रीला लागू झाला. मात्र, महाराष्ट्रातील एकाही मशिदीत हा कायदा लागू केला नाही. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. आता कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे', असं देखील भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले.