Sunday, August 31, 2025 08:57:54 PM

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: एसटी पास थेट तुमच्या शाळेत

महाराष्ट्र एसटी महामंडळाची ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम 16 जूनपासून सुरू. विद्यार्थी थेट शाळेतून पास मिळवतील. वेळ, त्रास वाचेल. हा उपक्रम अभ्यासातही मदतीचा ठरणार.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एसटी पास थेट तुमच्या शाळेत

अभिनव उपक्रम: विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) आता विद्यार्थ्यांसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम 16 जूनपासून राबवणार आहे. या उपक्रमामुळे लाखो विद्यार्थ्यांना एसटी पास मिळवण्यासाठी केंद्रांवर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याअंतर्गत एसटीचे कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या यादीनुसार पास वितरित करतील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्यांचा अभ्यासक्रम अधिक सुरळीतपणे सुरू ठेवता येईल.

राज्यातील लाखो विद्यार्थी एसटी बससेवेचा नियमित वापर करतात. शासनाकडून विद्यार्थ्यांना 66.66% सवलतीसह एसटी पास दिला जातो, म्हणजे फक्त 33.33% रक्कम भरून ते मासिक पास घेऊ शकतात. याशिवाय, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास उपलब्ध करून दिले जातात.

हेही वाचा: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाची दुरवस्था; वारकऱ्यांची मोठी गैरसोय

यापूर्वी अनेक वेळा विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी एसटी आगार किंवा पास केंद्रांवर तासनतास रांगेत उभं राहावं लागत होतं. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात होता आणि कधीकधी शाळाही चुकत असे. पण या नव्या उपक्रमामुळे हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांच्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी एसटी प्रशासनाला पुरवायची आहे. या यादीच्या आधारे एसटी कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन पास वितरित करतील.

या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांना सहज, वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे की, हा उपक्रम राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास हा उपक्रम अधिक यशस्वी होईल.

हेही वाचा:'फडणवीसांना वाटतं ते सगळ्यांना नाचवू शकतात'; संजय राऊतांची फडणवीसांवर जहरी टीका

एसटी महामंडळाने अनेक वर्षांपासून राज्यातील नागरिकांना सुरक्षित प्रवास सेवा पुरवली आहे. प्रत्येक दिवशी लाखो प्रवासी एसटी बसमधून प्रवास करतात. एसटीकडून बसची नियमित देखभाल केली जाते, चालक-वाहकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित ठरतो. एसटी प्रशासनाचा विश्वास आहे की, त्यांच्या या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल.


सम्बन्धित सामग्री