Sunday, August 31, 2025 07:01:50 AM

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नागरिक आणि शेतकरी संकटात. 5 जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 हून अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी.

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

महाराष्ट्र: राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर इतरांना यलो अलर्ट

पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, सोलापूर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, वाशिम, यवतमाळ यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि येवला परिसरात वादळाची दहशत

छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळीचे लोट निर्माण झाले. पैठण, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर या भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. येवला शहर व तालुक्यात पाटोदा, विखरणी या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसामुळे झाडे आणि विजेचे खांब कोसळले.

महाडमध्ये सभेला पावसाचा व्यत्यय

महाडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेदरम्यान तुफान पाऊस झाला. जोरदार विजांच्या कडकडाटामुळे सभा काही काळ विस्कळीत झाली.

अमळनेर यात्रेत दुकानदारांचे मोठे नुकसान

अमळनेर येथील सखाराम महाराज यात्रेत पावसाचे पाणी दुकांनांमध्ये शिरल्याने 20 दुकानांचे नुकसान झाले. बोर नदी पात्रात पूरस्थिती निर्माण झाली असून नगरपरिषदेकडून पाणी काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

सातारा आणि फलटणमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम

सातारा शहरात विसावा नाका चौक पाण्याखाली गेला. फलटण तालुक्यात वीज पडून गाय ठार झाली. दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली.

नांदेडमध्ये वीज पडून तरुणाचा मृत्यू

नायगाव तालुक्यात सांगवी येथे वीज पडून चंद्रकांत महागवे (29) यांचा मृत्यू झाला. आठ जनावरे देखील दगावली. कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

बुलढाणा व मनमाडमध्ये पावसामुळे मोठी हानी

नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे, घरांची छपरे उडाली. मनमाडमध्ये मध्यरात्री जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचले.

शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान

राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे शेती, जनावरे, वाहतूक व्यवस्था आणि व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे पीक, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने चिंता वाढली आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून राज्य सरकारकडून तातडीने मदत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.


सम्बन्धित सामग्री