हिंसक राजकारणाच्या छायेखाली महाराष्ट्र सरकारमध्ये आराजकता - संजय राऊत
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या आधारावर निवडून आलेल्या 56-57 आमदारांचे भविष्यच धोक्यात आले असून, हे आमदार सरकारलाच आव्हान देत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे राऊत यांनी ठणकावून सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी गद्दारी केल्याने शिवसेना (शिंदे गटावर) टीका करताना, कितीही गंगास्नान केले तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, “सध्या राज्यात वेड्यांचे सरकार आहे. मंत्रालयामध्ये वेड्यांची जत्रा भरली आहे. गृह मंत्रालय, म्हाडा, एसआरए यांसारख्या विभागांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु असून, पैसे दिल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. प्रत्येक अधिकाऱ्याची नेमणूक पैशांच्या देवाणघेवाणीवरच झाली आहे. हे अधिकारी कोट्यवधींचा गल्ला गोळा करून मंत्र्यांना अर्पण करतात. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे घेतले व दिले, हे मी उघड करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्यात कितीही स्नान केले तरी 40 गद्दार आमदारांचे पाप धुतले जाणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एक साबण द्यावा, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. “गंगा पवित्र आहे, साधू-संत आणि निष्पाप लोकांना पुण्य मिळते. मात्र, गद्दारांना पुण्य मिळणार नाही. गंगेचा इतिहास आम्हाला माहिती आहे,” असे राऊत म्हणाले. त्यांनी शिंदे यांच्या कुंभमेळ्यात जाण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली.
“राज्यात सध्या समांतर सरकार काम करत आहे. शिंदे यांनी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष, वार रूम तयार केली असून, मंत्र्यांना फडणवीस यांचे आदेश पाळू नका, असे सांगितले जाते. हे समांतर सरकार अंडरवर्ल्डप्रमाणे काम करत आहे. फडणवीसांनी जर हे थांबवले नाही तर राज्य अराजकतेकडे जाईल,” असा गंभीर इशारा राऊत यांनी दिला.